सोलांबीची सफर: ३ खट्याळ मुलांची कहाणी.
“बाला(माझा भाऊ)”, त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे रे? "आपल्यासारखी इतर गावे अजुन काय असणार", बाळाने उत्तर दिले. "बोर्ली (गाव) तिथून किती लांब असेल?" मी कुतूहलाने विचारले. "एकदा का तो डोंगर पार केला की तिथून 1-2 किमी अंतरावर असेल".
"व्वा, याचा अर्थ असा आहे की मी तो डोंगर पार केला तर मला तिला भेटण्याची संधी मिळेल (मी माझ्या मनात कल्पना केली). “दादा! तु का हसत आहेस मनातल्या मनात? बाळाने विचारले. “काही नाही रे. पण मला तो डोंगर पार करायचा आहे. जाणून घायच आहे तिकडचं जग". "काय? तू वेडा आहेस का? २५ किलोमिटर तू काय चालत जासिल. तिथे जाण्यासाठी मोकळा रस्ता नाही. मार्ग शोधत जावं लागेल. या व्यतिरिक्त, जंगली डुक्कर, विषारी साप, काळे विंचू असे धोकादायक प्राणी तुझी वाट पाहत असतील."
त्यांनी मला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला.
काहीही असो, मी कोणत्याही किंमतीत तो डोंगर पार करेनच. Adventure व्यतिरिक्त, मला तिला भेटण्याची संधी मिळू शकते. पण मला एकट जायची भीती वाटत होती. माझ्यासोबत येऊ शकणारी एक व्यक्ती म्हणजे माझा लंगोटिया यार (बालपणीचा मित्र) वैभव ज्याला adventure ची आवड आहे. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याला माझ्या crush बद्दल माहिती आहे म्हणून तो मला तिथे जाण्यासाठी मदत करू शकतो.
गावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी लाइट्स गेल्या होत्या. चंद्राच्या प्रकाश्यात मंद वारा वाहत होता. झाडाखाली बसलेला वैभव मला दिसला. मी त्याच्या जवळ गेलो. "वैभव गावात नवीन काय चाललंय?" पाठीवर थाप मारून विचारलं. "काहीही नाही, नेहमीप्रमाणेच", त्याने उत्तर दिले. आम्ही गावात होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर गप्पा मारल्या. मध्येच मी त्याला त्या डोंगराबद्दल विचारले, “तु कधी तो डोंगर पार केला आहेस का?"
"कोणता"?
"सोलांबी".
"अजून नाही. पण मी माझ्या आजीकडून याबद्दल ऐकले होत. जुन्या काळी, वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसताना लोक ते डोंगर पार करायचे. आता जुन्या वाटा नाहीसा झाला आहेत. तिथे कसे पोहोचायचे हे कोणालाच माहीत नाही. थांब …थांब ..थांब... तू का विचारत आहेस? आता मला समजले की तुला तिला भेटायला जायचं आहे ना, नाही का?
"अ.. अ …अ …अस नाही रे. पण हो आणि तू माझ्यासोबत यावे अशी माझी इच्छा आहे."
"काय? तुला मी वेडा दिसतो तुझ्याबरोबर यायला. तो पण फक्त तुझ्या crush ला भेटण्यासाठी जी तुला ओळखतही पण नाही. मी नाही येत जा."
"अरे चिल, adventure साठी चल माझ्यासोबत".
कसेतरी मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही तो तयार नव्हता. खूप विनवण्यांनंतर तो माझ्यासोबत यायला तयार झाला.
तो पर्वत ओलांडण्यापेक्षा सर्वात कठीण आव्हान म्हणजे बाळाला मनवणे. तो तसा हट्टी आहे. तो कोणाचेही ऐकत नाही आणि त्याला आवडेल तेच करतो.
माहीत नाही पण सोलांबी पर्वत ओलांडण्याच्या माझ्या साहसाबद्दल मी त्याला समजावून सांगितल्यावर तो कोणत्याही अटीशिवाय यायला तयार झाला. पण त्याला माझ्या खऱ्या हेतूची कल्पना नव्हती. जर त्याला माझा खरा हेतू कळला असता तर त्याने आईला सांगितले असते आणि तिने मला जाऊं दिलं नसत.
सकाळी जायचं ठरवलं. अलार्म वाजण्यापूर्वीच मला जाग आली. माझ्या शेजारी झोपलेला बाला गाढ झोपेत होता.
त्याची झोप कुंभकरणासारखी आहे. "बाळा उठ… उठ बाळा.. हळु आवाजात मी त्याला उठवायचा प्रयत्न केला. मी त्याच्यावरून चादर वोढली. 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर तो जागा झाला. बिस्किटे, वेफर्स, पाण्याची बाटली, चाकू (सुरक्षेसाठी) आणि लाकडी काठी (चढताना आधारासाठी) घेऊन आम्ही बॅकपॅक घेऊन तयार झालो.
6 च्या सुमारास आम्ही मागच्या दारातून हळू चालत पळून जाण्याचा प्रयत्न केला. हळू.. हळू पाय टाकत जात असताना. अचानक माझ्या लहान बहिणीने आम्हाला पाहिले. तिला वाटले की आम्ही परत काही तरी नवीन कांट करण्यासाठी कुठेतरी जात आहोत. तिने आमच्याकडे रागाने पाहिलं. मी हात जोडून आईला सांगू नकोस अशी विनंती करू लागलो. मी नाही…नाही…नाही म्हणत मान हलवली. पण तिनेही "हो... हो... हो मी आईला सांगेन" म्हणत मान हलवली. तिने ते केले. आईला जाग येण्यापूर्वीच आम्ही पळ काढला.
माझ्या घराच्या मागे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली वैभव आमची वाट पाहत होता. आम्ही आमचा प्रवास उत्साहाने सुरू केला. मी फुल पँट, हिरवा टी-शर्ट आणि टोपी घातली होती. वैभव जीन्स आणि टी-शर्ट घातलेला होता. आमचा साहसी मार्गदर्शक म्हणून बाला लाकडी काठी धरून आम्हाला सोलंबी पर्वताच्या वाटेवर घेऊन जात होता.
मी जस विचार करत होतो तितका प्रवास सोप्पा नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासाशिवाय (सुमारे 25 किमी) डोंगराचा उतार, कडक उन्हाळा, काटेरी झुडपे इत्यादी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार होते.
आम्हाला एकूण 3 पर्वत चढावे लागणार होते. नेहमीप्रमाणे आम्ही पहिला डोंगर सहज चढलो. चढताना आमच्यासोबत जंगलात चरणारी गुरेही होती. मोरांचा आवाज माऊ.. माऊ.. करून दुरूनच सकाळची प्रसन्न अनुभूती देत येत होता.
चिऊ ताई आपल्या बाळांना निरोप देत घरटे सोडत होते.
वेगाने झपाझप पावले टाकत, साड्या नेसलेल्या, एका हातात कोयती धरून आणि दुसर्या हातातून भाकरी खाणारी बायकांची टोळी फाटी आणायला निघाली होती. त्यांनी आमची चेष्टा केली, “अरे पोरांनो, कुठे चालला आहात?” “तू खूप गोंडस आहेस”, बाळाचे गाल ताणून एका बाईने त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. बाळाने तिच्याकडे रागाने बघितले, “माझा गाळ सोड नाहीतर मी शेण फेकून मारीन" त्याने मूठभर शेण उचलले. ते पाहताच बाळाला शिव्या देत ते पळून गेल्या. बाळानेही आपल्या गोड वाणीतून शिव्या दिल्या.
८ वाजता आम्ही जंगलात असलेल्या गावदेवी मंदिरात पोहोचलो. देवीचा आशीर्वाद घेतला आणि आमच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना केली.
आता इथून दुसरा डोंगर सुरू होतो. दुसरा डोंगरात मोठमोठी झाडे, झुडपे आणि पातेरा पडला होता. चढायला थोडासा तीव्र उतार होता. नुसत्या पडलेल्या शेतजमिनीवरून आपल्याला कल्पना आली की आपले पूर्वज जुन्या काळी येथे शेती करत असावे. पण गावापासून लांब असल्याने ती आता अडगळीची जमीन राहिली. झाडांची घनता इतकी दाट होती की सूर्याची थोडीशी किरणे सुद्धा जमिनीवर पडत नव्हती . त्यामुळे गवताचे प्रमाण कमी होते. अर्ध्या वाटेने चढून आम्ही दमलो. सोबत आणलेले सर्व पाणी प्यायलो. मी प्रवासात उत्साही असलो तरी मी सर्वात कमकुवत होतो. मला सापांची भीती वाटत होती. म्हणून, मी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकले. सापावर पाय ठेवला तर काय, वाळलेल्या पानाखाली साप लपला तर काय, असे नकारात्मक विचार मनात निर्माण यायला लागले. अचानक वैभव माझ्या डोक्यावर टपाली मारली “ negative विचार केलास ना तर fight च मारीन”. "ठीक आहे नाय करणार", मी उत्तर दिले.
"आईई ग आई ग... ( वैभवचा किंचाळणारा आवाज) मी मागे वळून पाहिले तर वैभव वेदनेने किंचाळत होता. काटा त्याच्या पायात घुसलेला आणि तो रक्त बंबाल झालेला. वैभव लहान मुलासारखा रडू लागला. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. बाला पुढे येऊन त्याचा डावा पाय मांडीवर घेतला. हळू..हळू...तो काटा काढायचा प्रयत्न करू लागला. खेचत असताना वैभव वेदनेने किंचाळला. काटा काढला तेव्हा त्याला थोडा आराम मिळाला. पण अजूनही त्याचे रक्त वाहत होते. बाला जंगलात जाऊन माती सारखा दिसणारा औषद घेऊन आला आणि तो आणून जखमेवर लावला.
“ही पावडर कशासाठी आहे? जखम लवकर बरी होईल का?" मी विचारले.
"नाही. पण रक्त वाहणे थांबवण्यास मदत होईल," बाळाने उत्तर दिले.
वैभवच्या खांद्याला आधार देत आम्ही पुढे निघालो. आता गाणी नावाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा 11 वाजले होते. इथे जुन्या पाण्याच्या टाक्या होत्या. जुन्या काळी या ठिकाणावरून आमच्या गावांना पाणीपुरवठा होत असे. ही जागा खूप मस्त आणि शांत होती. वाहणाऱ्या थंड वाऱ्याने माझा घाम सुकवला. माझ्यासाठी तो निवांत क्षण होता.
आम्ही वैभवला एका सपाट खडकावर ठेवले आणि मी पाणी भरायला गेलो. पाण्याचा एकेक घोट माझी तहान भागवत होता. बिसलरीचे पाणी किंवा फळांचा रस सुध्दा फिका पडला असता. वैभव आणि बालानेही आपआपली तहान भागवली. बाळाने पिशवीतून बिस्किट काढले आणि ते आम्ही ते सर्व तोंडात कोंबून भरले कारण आम्हालाही भूक लागली होती.
तिसरा पर्वत:
गाणीपासून दुसरा डोंगर संपतो. आता शेवटचा आणि तिसरा डोंगर चाडयचा आहे.
“वैभव, तू ठीक आहेस ना आता?"
होय, मी ठीक आहे. "
संघर्ष आणि अडचणींशिवाय adventure नाही" असे म्हणत वैभव देखील adventure चा आनंद घेत होता. त्यांच्या शब्दांनी मला प्रेरणा दिली. तिसरा डोंगर दुसऱ्या डोंगराइतका मोठा किंवा अवघड वाटत नाही. मात्र, ते दाट काटेरी झुडपानी आणि बांबूने झाकलेला होता. जंगली डुकरे या झुडपात लपून बसलेलि असतात. त्यामुळे आम्हाला खूप काळजी घ्यावी लागनार होती. मला आणि वैभवला वर जाण्याचा कोणताही मार्ग किंवा जुना मार्ग दिसत नव्हता. आम्ही बाळाला विचारले,
“ बाला, पुढे काय? आपण हा डोंगर कसा पार करणार?"
“फक्त माझ्या मागे या,” बाला कडक आवाजात म्हणाला. तो आमचा captain आणि आम्ही त्याचा assistant असल्याप्रमाणे आम्ही त्याच्या मागे निघालो. मी दोघांच्या मधे चालू लागलो. कारण मला सर्वात जास्त भीती वाटत होती. जंगलातून कोणी आमच्यावर हल्ला केला तर अशी भीती वाटत होती.
आम्ही नुकतेच चढायला सुरुवात केली आणि झाडावरून वाळलेल्या सापाची कोश माझ्या डोक्यावर पडली. त्याच्या हलक्या वजनामुळे, मला त्याचे अस्तित्व जाणवले नाही. पण माझ्या मागे वैभव हे दृश्य एन्जॉय करत होता आणि हसत होता. मी फक्त त्याच्याकडे बघितले आणि विचारले, काय? "तु मजा घेत आहात का?"
"नाही रे".त्याने हसून मान हलवली.
डोंगराचा निम्मा उतार पार केल्यावर माझ्या गावाचे सुंदर दृश्य दिसले. खरसई धरण, भरती आलेली खाडी, चालणारी वाहने मुंग्यांसारखी दिसत होती. इतके सुंदर दृश्य मी कधीच अनुभवले नव्हते. आम्ही जोरात आवाज करू लागलो . हुर्रे... हुर्रे. हुर्रे… मी उताराच्या मधोमध नाचू लागलो. बाळाने माझ्या डोक्यावर सापाची वाळलेली कोश पाहिली आणि त्याने मला चापट मारली आणि माझ्या हातावर वाळलेली कोश ठेवली.
"ही काय फालतुगिरी?"
मी दचकलो आणि कोश लगेच फेकून दिली. वैभव कडे रागाने पाहिलं जो हसत होता आणि मला काही सांगितलं नाही. मी त्याच्या वर तुटून पडलो. पण बाला मधीन आला.
तो क्षण आला जेव्हा आम्ही सर्व 3 पर्वत ओलांडून सर्वात ऊंच स्थानावर पोहोचलो. दुपारची वेळ होती आणि उबदार वारा वाहत होता. सूर्याची किरणे प्रखरतेने आमच्यावर पडत होती. ज्या डोंगरामागील जग मला नेहमी जाणून घ्यायची उत्सुकता होती ते माझ्या समोर होते.
पुढील भाग लवकरच……
Comments
Post a Comment